साकूरमध्ये आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांनी जपला सामाजिक सलोखा

संगमनेर(DSNews24/किरण पुरी)  ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील साकूर येथे उत्साह, शिस्त आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवत भव्य उत्सव साजरा करण्यात आला.

जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पारंपारिक पद्धतीने वाजतगाजत साकूर चौफुली ते आंबेडकरनगर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर उजळून निघाला होता. मिरवणुकीत शेकडो आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी साकूरमधील मुस्लिम बांधवांनी एक खास उपक्रम राबविल्याचे चित्र बघायला मिळाले. मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीतील आंबेडकरी अनुयायांचे ठिकठिकाणी स्वागत केले.

यावेळी मुस्लिम बांधव देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते. विशेषतः जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून आंबेडकरी अनुयायांना मुस्लिम बांधवांनी सरबताचे वाटप केले. साकूर बसस्थानक व आंबेडकर नगर येथे सरबताचे स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी मिरवणूकीतील प्रत्येकाला मुस्लिम बांधवांनी सरबत वाटप केले. या उपक्रमातून सामाजिक एकता आणि बंधुभाव दिसून आला. सामाजिक सलोखा कायम राहावा असा संदेश मुस्लिम बांधवांनी या माध्यमातून दिला आहे. तसेच या उपक्रमातून मुस्लिम बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान केला आहे. मुस्लिम बांधवांनी राबविलेल्या या खास उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

यावेळी आंबेडकरी अनुयायी, हिंदू बांधव, ग्रामस्थ, महिला, युवक, व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment