नवी दिल्ली – सध्या इराण अमेरिका इस्त्रायल देशांदरम्यान भडकलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या दरात झालेली प्रचंड वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. ही भीती आता खरी ठरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार होत असतानाही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मात्र, दरात बदल न केल्याने तेल कंपन्यांना डिझेलवर प्रतिलिटर तब्बल ३५ रुपये आणि पेट्रोलवर १८ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निर्णय रोखून धरण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदान संपताच पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे समजते.
