पारनेरमध्ये खळबळ… महिला डॉक्टरची आत्महत्या

पारनेर – लग्नानंतर माहेरहून १२ लाख रुपयांची मागणी, शिवीगाळ, दमदाटी आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका २६ वर्षीय महिला डॉटरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुयातील गोरेगाव येथे घडली डॉ. गौरी सुनिल चौरे (वय २६, रा. काळपट्टी वस्ती, गोरेगाव, ता. पारनेर) असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासर्‍यांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

तक्रारदार सुनिल जबाजी चौरे (वय ५४, रा. गोरेगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीचे लग्न २३ नोव्हेंबर २०२४ रोजी अमित बाबासाहेब दळवी (रा. तपोवन रोड, अहिल्यानगर, सध्या रा, कामोठा, मुंबई) यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे तीन महिने अहिल्यानगर येथे सर्व काही सुरळीत होते. त्यानंतर हे जोडपे मुंबईतील कामोठा येथे वास्तव्यास गेले. मुंबईला गेल्यानंतर पती अमित दळवी याने फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १२ लाख रुपये आण अशी मागणी करत गौरीला त्रास देण्यास सुरुवात केली. सासू आणि सासर्‍यांनीही तुम्ही लग्न साधे केले, भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा पैसे आणा, असे म्हणत तिला वारंवार टोमणे मारले. गौरीने खासगी रुग्णालयात नोकरी सुरू केली होती, परंतु तिचा पगारही सासरच्यांनी काढून घेतला.

तसेच, फेब्रुवारी २०२५ मध्ये तिच्या लग्नातील सोन्याचे दागिनेही बळकावून घेतल्याचे तिने आपल्या आई-वडिलांना फोनवरून सांगितले होते. पती अमित हा दारूच्या आहारी जाऊन पैसे मागण्यासाठी तिला मारहाण करत असे. गौरीने वेळोवेळी आपल्या आई-वडिलांना आणि काकांना याबाबत माहिती दिली होती.ऑटोबर २०२५ मध्ये गौरीच्या चुलत बहिणीच्या लग्नात आलेले सासरचे लोक म्हणाले, तुम्ही हे लग्न कसे मोठे केले? आमच्या वेळी भीक लागली होती का? यावर गौरीने आक्षेप घेतला असता, सर्वांसमोर तिचा अपमान करण्यात आला. फेब्रुवारी २०२६ मध्ये गौरीने आपल्या नवर्‍याचे इतर मुलींशी असलेले अनैतिक संबंध असल्याचे घरच्यांना सांगितले. याबाबत तिची आई मुंबईला जाऊन वाद मिटवून आली, तरीही छळ थांबला नाही.

२७ एप्रिल रोजी गौरी, तिचा पती अमित आणि सासरे बाबासाहेब हे गोरेगाव येथे आले. त्यावेळी अमितने, तू इथेच थांब, मी पप्पांना नगरला सोडून तुला घ्यायला येतो, असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर तो परत आला नाही आणि कोणाचेही फोन उचलले गेले नाहीत. २८ एप्रिल रोजी गौरी व तिची आई अहिल्यानगर आणि मुंबई येथे गेली, परंतु दोन्ही ठिकाणी घराला कुलूप होते. त्यानंतर २ मे रोजी गौरी गोरेगाव येथील घरात एकटी असताना सकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान तिने शिलिंगच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. आई शेतातून परत आल्यावर ही घटना उघडकीस आली

Leave a Comment