राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. किर्तनकार संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षकांनी ही शाईफेक केली असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला असून याचा व्हिडिओही समोर आला आहे. या घटनेनंतर विकास लवंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये सत्याग्रह करणार असल्याचे सांगितले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षकांनी ही शाईफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर सकाळी दहा वाजताची ही घटना घडली. अंगावर शाही फेकत धक्काबुक्की करून पिस्तूल दाखवला असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी लवंडे यांनी वारकरी सांप्रदायातील घुसखोर म्हणत 20 जणांची यादी जाहीर केली होती, या यादीवरुनच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
काय म्हणाले विकास लवांडे?
वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही 10/15 गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे. नंतर पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे . पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावा तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे.
