राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. किर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या साथीदारांनी आळंदी परिसरात लवांडे यांना गाठत त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. तसेच त्यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या फेकण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी लवांडे यांना धमकीही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या शाईफेकीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आता संग्राम भंडारी यांनी केलेल्या कृत्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
संग्राम जगताप म्हणाले की, मी हभप संग्राम बापू भंडारे यांचे अभिनंदन करतो आणि समर्थ देखील करतो त्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यांनी जे केले त्या मागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्राची आणि देशाची एक वेगळी परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपल्या धर्माची पताका घेऊन जात असताना अनेक लोकांनी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरिता समर्पित केले आहे. मात्र कोणीतरी उठतो आणि एखाद्या अधिकाऱ्यांसारखी यादी वाचतो. त्यामुळे बापूंनी जे केलेले आहे, त्याचे आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांनी अत्यंत योग्य भूमिका बजावली. या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला कोण सांगत हे देखील लोकांसमोर यायला हवं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
