जुन्नर हादरलं… मुलानेच वडिलांसह सख्ख्या भावाला संपवल

जुन्नर तालुक्यातून एक सुन्न करणारी आणि रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले असून मुलानेच वडिलांची आणि लहान भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जुन्नर तालुका आणि ओतूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ओतूर पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव मढ तर्फे येथील बगाडवाडी भागात हे हत्याकांड घडले. जयराम महादू मुकणे (वय 60 वर्ष) आणि राजेंद्र जयराम मुकणे (वय 27 वर्ष) अशी खून झालेल्या वडील व भावाची नावे आहेत. तर बाबजी जयराम मुकणे (वय 32 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपी मुलाचे नाव आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी बाबजी याने घरातील आणि शेजारी असलेल्या जड दगडाने आपले वडील जयराम आणि लहान भाऊ राजेंद्र यांच्या डोक्यावर व तोंडावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागीच तडफडून मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक तपासात आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकणे कुटुंबात गेल्या काही काळापासून प्रचंड कौटुंबिक कलह सुरू होता. शेतजमिनीची वाटणी आणि मालकी हक्कावरून वडील व आरोपी मुलामध्ये सतत खटके उडत होते. पैशांच्या देवाणघेवाणीवरूनही त्यांच्यात वारंवार भांडणे होत असे. तसेच वडील आपले लग्न लावून देत नाही याचा राग बाबजीच्या मनात होता. याच पैशांच्या आणि जमिनीच्या वादाने गुरुवारी रौद्ररूप धारण केले. नेहमीप्रमाणे होणाऱ्या भांडणाचे रूपांतर थेट खुनात झाले आणि रागाच्या भरात बाबजीने लाकडी चोपणीने मारहाण केली त्यानंतर डोक्यात दगड घालून वडील आणि भावाची हत्या केली.

आरोपी होता पळून जाण्याच्या तयारीत

वडिलांची आणि भावाची हत्या केल्यानंतर आरोपी बाबजी मुकणे याने पुरावा नष्ट करण्याचा आणि गावातून फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपी बाबजीला ताब्यात घेतले. ओतूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि/भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील सखोल तपास ओतूर पोलीस करत आहेत.

ज्या मुलाला वडिलांनी लहानाचे मोठे केले आणि ज्या भावासोबत बालपण गेले, त्याच दोघांचा एका क्षणाच्या रागात आणि पैशांच्या हव्यासापोटी जीव घेतल्यामुळे परिसरातून या नराधम मुलावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment