इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर ताण आला असूनही पुरेसा साठा उपलब्ध असल्याने, आगामी महिन्यांत तेल आणिवायू या दोन्ही प्रकारच्या इंधनाचे दर कमी होतील अशी अपेक्षा आहे, असा पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी दिलासादायी दावा केला.
सरकारी तेल कंपन्यांनी मे महिन्याच्या मध्यापासून आतापर्यंत चार वेळा इंधनाचे दर वाढवले आहेत. परिणामी पेट्रोलच्या दरात सुमारे ७.८ टक्के तर डिझेलच्या दरात ८.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रमुख राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सुरुवातीला इंधन दरवाढ रोखून धरली गेली होती. मात्र पश्चिम आशियातील लांबत गेलेल्या युद्धामुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या व्यत्ययाचा परिणाम भरून काढण्यासाठी दरवाढ अपरिहार्य ठरली. तथापि हे वाढलेले दर पुन्हा कमी केले जातील, अशी सर्वसामान्यांना दिलासा देणारी ग्वाही खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनीच दिली आहे.
वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी स्पष्ट केले की, तेलाचे दर सध्याच्या उच्च पातळीवर खूप काळ टिकून राहू शकत नाहीत आणि आगामी महिन्यांत ते कमी होण्याची अपेक्षा आहे. आखाती प्रदेशातील हा संघर्ष इतर क्षेत्रांपर्यंत पसरल्यास परिस्थिती चिंताजनक होऊ शकते, असे पुस्ती जोडत त्यांनी नमूद केले की, भारताकडे ७६ ते ८० दिवस पुरेल इतका तेल आणि वायूचा साठा उपलब्ध आहे. युद्धामुळे होर्मुझ खाडीच्या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध आल्याने जागतिक तेलाच्या दरात ४० टक्के वाढ होऊन ते पिंपामागे १०० डॉलरच्या आसपास पोहोचलेआहेत. संघर्ष सुरू होण्यापूर्वी या मार्गावरून जगातील एकूण तेल आणि वायू पुरवठ्यापैकी सुमारे एक-पंचमांश पुरवठा होत असे.
फेब्रुवारीमध्ये संघर्ष सुरू होण्यापूर्वी, भारत आपल्या खनिज तेलाच्या आयातीपैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रवीभूत पेट्रोलियम वायूच्या (एलपीजी) आयातीपैकी सुमारे ९० टक्के आयात याच मार्गावरून करत होता. तो पुरवठा सध्या बाधित झाला असला तरी पुरी यांनी सांगितले की, अमेरिका आणि कॅनडासह पश्चिम गोलार्धातील पुरवठादार तुटवडा भरून काढतील अशी त्यांना अपेक्षा आहे.
व्यापार आणि प्रवासात व्यत्यय आणणाऱ्या तसेच हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या या युद्धाचा अंत करण्यासाठी भारताने वारंवार संवाद आणि मुत्सद्देगिरीचा आग्रह धरताना, वाटाघाटी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
