सोलापुरात मुख्याध्यापकाने कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्याध्यापकाने दोन मुलं, पत्नीला संपवून नंतर केली आत्महत्या केली आहे. बार्शी तालुक्यात ही घटना घडली आहे.
आत्महत्येपूर्वी मुख्याध्यापकाने 22 पानांचं पत्र लिहिलं होतं. यामधून आत्महत्येचं कारण उघड होत आहे. दरम्यान या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.
योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात ते वास्तव्या होते. योगेश पाटील यांनी पत्नी माधुरी, मुलगा अथर्व आणि शिवांश यांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली. शेअर मार्केटमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांच्यावर 1 कोटी 80 लाखांचा कर्जाचा डोंगर झाला होता. या कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
योगेश पाटील हे आपली पत्नी आणि मुलांसह गावी आले आहेत. शेअर मार्केटमध्ये मोठं नुकसान झाल्याने योगेश पाटील यांनी कुटुंबाला ठार केलं आणि नंतर आत्महत्या केली. पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली असून, तपास सुरु आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिली आहे.
घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून त्यात त्यांनी कशाप्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस सुरुवात केली आणि नुकसान झालं हे सविस्तरपणे सांगितलं आहे. त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. त्यातूनच त्यांनी हे कृत्य केलं असावं असं त्यांनी म्हटलं आहे.
