ब्रेकिंग! फडणवीस सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात पारनेरमध्ये सर्वपक्षीय एकवटले 

पारनेर(DSNews24/किरण पुरी) फडणवीस सरकारने कर्जमाफीसाठी काढलेला शासन आदेश फसवा आहे. कर्जमाफी आदेशात अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. राज्यातील ५ टक्केच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असून उर्वरित ९५ टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे.

फडणवीस सरकारने केलेली ही कर्जमाफी फसवी असून या विरोधात पारनेर तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटना, शिवबा संघटना, निलेश लंके प्रतिष्ठान, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, उद्धव ठाकरे गट, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, युवा सेना, शेतकरी सेना, कॉंग्रेस, शरद पवार गट, आमची माती आमची माणस या सर्वपक्षीय व संघटना एकत्रित येत दि. १० जून रोजी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने भव्य आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तहसील कार्यालयावर लवकरच निषेध मोर्चा काढून शासन निर्णयाची सर्वपक्षीय व संघटनांच्या वतीने जाहीर होळी करण्यात येईल. तसेच त्यानंतर खासदार निलेश लंके व आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन देण्यात येईल.

शासनाच्या कर्जमाफीतील समितीच्या एका प्रमुखाशी मंत्रालयात बैठक लावण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांना आग्रह धरणार असल्याचे या सर्वपक्षीय बैठकीत ठरले.

फसव्या कर्जमाफीच्या विरोधात पारनेर तालुक्यातील सर्व पक्षीय व संघटना एकत्रित आल्याने पुढील काळात मोठं जन आंदोलन पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी आप आपले झेंडे बाजूला सारून थेट शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येत वज्रमूठ दाखवली आहे.

Leave a Comment