कर्जमुक्तीसाठी पारनेर तहसीलवर २३ जूनला धडकणार सर्वपक्षीयांचा जनआक्रोश मोर्चा

पारनेर(DSNews24/किरण पुरी) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी २३ जून रोजी पारनेर तहसील कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बैठकीत राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण कायम त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच २३ जून रोजी होणारा जनआक्रोश मोर्चा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी मोर्चाच्या नियोजनासंदर्भात विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. गावोगावी जनजागृती करून मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी होतील, यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या.

बैठकीच्या शेवटी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रितपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे आगामी जनआक्रोश मोर्चाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment