साकूरकरांना मुळा नदीच्या जलपूजनाची प्रतिक्षा

संगमनेर(DSNews24/ किरण पुरी) संगमनेर – पारनेर तालुक्यातील मुळा नदीलगतच्या गावांसाठी वरदान ठरलेले पिंपळगाव खांड धरण भरल्यानंतर त्यातील पाणी मुळा नदी पात्रातून साकूर परिसरात येते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही साकूरकरांना मुळा नदीच्या जलपूजनाची मोठी उत्सुकता लागली आहे.

मात्र यावर्षी पावसाचा जोर कमी असल्याने पिंपळगाव खांड धरण कधी भरेल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. साकूर पठार भागासह मुळा नदीलगतच्या गावांतील बळीराजा सध्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मुळा नदी कधी प्रवाहित होणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

नदीवर आधारित ग्रामपंचायतींच्या नळपाणी पुरवठा योजना तसेच शेतकऱ्यांनी उभारलेल्या पाईपलाईन सध्या कोरड्या पडल्या आहेत. पाणी उपलब्ध नसल्याने या योजना थांबलेल्या अवस्थेत आहेत. तसेच मुळा नदी अक्षरशः कोरडी ठाक पडली आहे.

गेल्यावर्षी जून महिन्यातच मुळा नदी प्रवाहित झाली होती. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी नदी पात्र कोरडेच आहे. मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या हरिश्चंद्रगड परिसरातही पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुळा नदी कधी वाहणार याचीच प्रतिक्षा शेतकरी व नागरिकांना लागली आहे.

पठार भागातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. कारण शेतातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहे. त्यामुळे पाऊस कधी पडेल अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Leave a Comment