मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच विमानातून प्रवास 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच प्रवासी विमानातून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात मुंबईत यशस्वी सभा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू होत आहे. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे वाशिम आणि यवतमाळच्या दौऱ्यावर निघाले आहेत.

या दौऱ्यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणे चार्टर्ड विमान न वापरता थेट ‘इंडिगो’च्या नियमित विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, तसेच खासदार अनिल देसाई हे देखील होते.

ठाकरे-फडणवीसांच्या गप्पा, राऊतही सोबत

विमानात झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी हलक्या फुलक्या विषयांवर गप्पा मारल्या.

दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याच विमानाने नागपूरसाठी रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘इंधन वाचवा’ मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवून इंडिगो विमानाने प्रवास करणे पसंत केले.

आजी-माजी मुख्यमंत्री आमनेसामने

शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर आणि बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा हा अशा प्रकारचा पहिलाच एकत्रित विमान प्रवास आहे. प्रवासादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, आम्ही तिघे भेटलो, हीच बातमी आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असताना, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ठाकरेंच्या हवाई प्रवासाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना जोरदार उधाण आले आहे.

Leave a Comment