पोखरी उपोषण प्रकरण : “आरोपींना दोन दिवसांत अटक करा ; अन्यथा विधानभवनासमोर आत्मदहन” – कुंडलीक पवार यांचा इशारा

पारनेर(DSNews24) तालुक्यातील पोखरी येथील मारहाण प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचा आरोप करत कुंडलीक सखाहरी पवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून दोन दिवसांत आरोपींवर कारवाई न झाल्यास मुंबईतील विधानभवनासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कुंडलीक पवार यांनी निवेदनात काय म्हटले 

२९ मे २०२६ रोजी गावठाण गट क्रमांक १९ मधील जागेच्या वादातून माझ्या मुलावर शिवम महादू पवार, प्रवीण विठ्ठल पवार, अक्षय महादू पवार, राजू बन्सी पवार आणि अमोल बन्सी पवार यांनी संगनमताने जीवघेणा हल्ला करून गंभीर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर ३ जून रोजी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी दबावापोटी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींकडून सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी माझा मुलगा रावसाहेब कुंडलीक पवार यांनी २९ जूनपासून पोखरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचे तीन दिवस उलटूनही पोलिस प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. संबंधित आरोपींना पोलिसच पाठिशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“आरोपी गावात मोकाट फिरत आहेत. माझा मुलगा न्यायासाठी उपोषण करत आहे. संपूर्ण कुटुंब भयभीत असून आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. न्याय मिळत नसेल तर जगून काय उपयोग,” अशी व्यथा कुंडलीक पवार यांनी निवेदनातून मांडली आहे.

तसेच, “दोन दिवसांत आरोपींना अटक करून न्याय मिळाला नाही तर मी मुंबईतील विधानभवनासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करेन. माझ्या किंवा माझ्या मुलाच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याला पारनेर पोलीस प्रशासन जबाबदार राहील,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पारनेर पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान कुंडलीक पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाने पोलिस प्रशासनापुढे संबंधित आरोपींना अटक करण्याचे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

Leave a Comment