पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्षाची गाडी फोडत प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष असलेल्या वैभव सोलनकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी जोरदार दगडफेक केली. हल्लेखोरांपैकी एकाच्या हातात कोयता असल्याचा खळबळजनक दावाही सोलनकर यांनी केला आहे.
वैभव सोलनकर हे शनिवारी (ता.11 जुलै) शेटफळेगडे येथील शेतकऱ्यांची बैठक संपवून घरी परतत होते. याचदरम्यान, त्यांच्यावर पालखी महामार्गालगतच्या कान्हेरी रोडवर हा जीवघेणा हल्ला झाला.
दोन दुचाकींवरून आलेल्या अज्ञातांनी सोलनकर यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. हल्लोखोरांच्या दुचाकी या विना नंबरप्लेटच्या होत्या. तसेच त्यांच्यापैकी एकाच्या हातात कोयता असल्याचंही वैभव सोलनकर यांनी सांगितलं आहे. यावेळी हल्लेखोरांनी सोलनकरांच्या एका हातावर वार केल्याची माहिती समोर येत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. वैभव सोलनकरांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पोलिसांकडून फरार हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
