BIG BREAKING… जयंत पाटील होणार राज्याचे नवे अर्थमंत्री? शिंदेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग 

मुंबई – राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याकडे राज्याच्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त भेटीगाठींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप नेते विनोद तावडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भेटींनंतर जयंत पाटील यांच्या नावावर सहमती झाल्याचे बोलले जात आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अर्थखाते देण्याबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या भेटीगाठींमुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सलोखा निर्माण करण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. केंद्रातील महत्त्वाच्या विधेयकांना पाठबळ मिळावे आणि राज्यातील सत्तासमीकरण अधिक मजबूत व्हावे, यासाठीही या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

यापूर्वी जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर शरद पवार, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. या सर्व भेटी वेगवेगळ्या कारणांसाठी झाल्याचा संबंधित नेत्यांचा दावा असला, तरी त्यामागे मोठी राजकीय रणनीती असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यातील आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्याकडे अर्थखाते सोपवले जाते का आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याच्या चर्चांना प्रत्यक्ष स्वरूप मिळते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment