मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या रणांगणात सभापती राम शिंदेंची ‘साकूर भेट’ ; बाजीराव पा. खेमनर यांचे स्पष्टीकरण

संगमनेर (DSNews24 / किरण पुरी) अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दौऱ्याने या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेत प्रथमच भाजपाची सत्ता आणली होती. आता त्या सत्तेची पुनर्रचना आणि आगामी समीकरणांच्या दृष्टीने सभापती राम शिंदे यांनीही जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव प्रक्रिया पूर्ण झाली. अपेक्षेप्रमाणे कर्जत आणि जामखेड तालुक्यांतून राम शिंदे यांच्या नावाचे ठराव मंजूर झाले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी प्रथमच सक्रियपणे लक्ष घातल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी जिल्ह्यातील विविध नेत्यांच्या भेटीगाठींना सुरुवात केली असून पुढील दोन दिवस ते जिल्ह्यात तळ ठोकून राहणार आहेत.

याच दौऱ्याचा भाग म्हणून आज, शनिवार (दि. १८ जुलै) रोजी सायंकाळी ५.३० वाजता सभापती राम शिंदे हे संगमनेर तालुक्यातील साकूर येथे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. सहकार क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या खेमनर यांच्या भेटीला जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होणार याची अधिकृत माहिती नसली, तरी आगामी निवडणुकीच्या रणनीती, सहकार क्षेत्रातील घडामोडी आणि संभाव्य राजकीय समीकरणांबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक न राहता आगामी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी प्रथमच सक्रिय भूमिका घेतल्यामागेही एक कारण सांगितले जात आहे. सन २०२५ मध्ये जिल्हा बँकेच्या वार्षिक अहवालात विधानपरिषदेचे सभापती असतानाही त्यांचा फोटो प्रकाशित करण्यात आला नव्हता. यावरून त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जामखेड शाखेसमोर निदर्शनेही झाली होती. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत स्वतः राम शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत, “आता बँकेत लक्ष घालावे लागेल,” असे सूतोवाच केले होते. त्यानंतरपासूनच त्यांनी बँकेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दुसरीकडे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ७३२ ठराव नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध सहकारी विकास संस्था – १३५, शेतीपूरक संस्था – ३०८ आणि बिगरशेती संस्था – २९० ठरावांचा समावेश आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या नावांचेही ठराव मंजूर झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संगमनेर तालुक्याची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

आता सभापती राम शिंदे यांच्या साकूर भेटीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणती नवी राजकीय समीकरणे आकाराला येतात, याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या भेटीबाबत DSNews24 शी प्रतिक्रिया देताना बाजीराव पा. खेमनर यांनी स्पष्ट केले की, “सभापती राम शिंदे हे सदिच्छा भेटीसाठी येत आहेत. त्यांच्या भेटीची माहिती मला कालच मिळाली. ही केवळ सदिच्छा भेट असून, यामागे कोणताही राजकीय हेतू नाही.”

Leave a Comment