शिर्डी हादरली! मंदिरासमोर महिलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या 

शिर्डी : साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीतून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साईमंदिर परिसरात फोटो आणि फळे विकणाऱ्या महिलांच्या आपापसातील वादातून एका ३० वर्षीय महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास महिलेचा खून झाला. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करत दोन्ही आरोपी तरुणींना गजाआड केले आहे.

नेमकी घटना काय?

जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय ३०) या महिला साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर नेहमीप्रमाणे फळे विकण्यासाठी बसल्या होत्या. त्याच परिसरात फोटो-स्टिकर आणि फळे विकण्याचे काम करणाऱ्या अंजली खंडीझोड (वय २२) आणि फिजा पटेल (वय २१) या दोन तरुणींसोबत त्यांचा काही कारणांवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात अंजली आणि फिजा यांनी जयश्री यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. साई मंदिरासारख्या गजबजलेल्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील परिसरात घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

उपचारादरम्यान मृत्यू

चाकूच्या हल्ल्यात जयश्री क्षीरसागर या गंभीर जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्री यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही सोमवारी पहाटे उपचारादरम्यान जयश्री यांची प्राणज्योत मालवली.

दोन्ही आरोपी तरुणींना अटक

या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी तरुणी अंजली खंडीझोड आणि फिजा पटेल यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

किरकोळ वादातून हत्या, पोलिसांचा अधिक तपास सुरू

व्यवसाय करताना झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. मात्र, या हत्येमागे आणखी काही कारण आहे का? याचा सखोल तपास शिर्डी पोलीस करत आहेत. दोन्ही आरोपी तरुणींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. साई मंदिर परिसरात घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे शिर्डीतील स्थानिक विक्रेत्यांमध्ये आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Comment