पंढरपूर हादरले! आषाढी यात्रेच्या बंदोबस्तावेळी पोलिसाची आत्महत्या

यंदाच्या देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर दिसत आहे. अशातच पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली.

या पोलिसाने गोळी झाडून आयुष्य संपवलं. कामाच्या तणावातून या पोलिसाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास या पोलिसाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरमध्ये आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने आत्महत्या केली. डोक्यात गोळी झाडून घेत या पोलिसाने स्वत:चं आयुष्य संपवलं. पंढरपुरमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसाने हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली. कामाच्या तणावातून जवानानं आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रामेश्वर ध्रुपद साबणे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते मूळचे परभणीच्या गंगाखेड येथील रहिवासी आहेत.

स्वतःच्या रिवाल्वरमधून गोळी झाडली

ही दुर्दैवी घटना आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास कासेगाव रोडवरील मुक्कामाच्या ठिकाणी घडली आहे. रामेश्वर साबणे हे छत्रपती संभाजीनगर येथे एसआरपीमध्ये जवान म्हणून कार्यरत होते. आषाढी यात्रेनिमित्ताने ते तीन ते चार दिवसांपासून पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आले होते. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःच्या रिवाल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. याबाबत स्थानिक पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

Leave a Comment