संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील जांबुत बुद्रुक व जांबुत खुर्द या दोन गावांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील महत्त्वाच्या पुलाच्या संरक्षण कठड्यांची अत्यंत दुरवस्था समोर आली आहे. पुलावरील लोखंडी अँगल व कठड्यांचे पाईपच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या पुलावरून दररोज शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच दुचाकीस्वारांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, संरक्षण कठडे तुटलेले आणि काही ठिकाणी लोखंडी अँगल कापून नेल्याचे दिसून येत असल्याने रात्री-अपरात्री मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून पुलावरील लोखंडी अँगल काही ठिकाणी कापून नेण्यात आले आहेत. तरीही संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या पुलाच्या संरक्षण कठड्यांच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहे. त्यामुळे “सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं करतंय तरी काय?” असा संतप्त सवाल जांबुतकरांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनी पुलाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
