संगमनेर – जांबुत खुर्द येथे बिबट्याचा धुमाकूळ ; दोन शेळ्या व एक बोकड फस्त

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील जांबुत खुर्द येथे बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकरी किरण रमेश बुरके यांच्या दोन शेळ्या व एक बोकड ठार केले, तर आणखी दोन शेळ्यांना गंभीर जखमी केल्याची घटना दि. २६ जुलै रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जांबुत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण रमेश बुरके हे जांबुत खुर्द येथील गट क्रमांक १०८ मध्ये वास्तव्यास आहेत. २५ जुलै रोजी सायंकाळी शेळ्या चारून आल्यानंतर त्यांनी त्या घराशेजारी असलेल्या मुक्त गोठ्यात बांधल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्याच्या जाळीखालून आत प्रवेश करून हल्ला चढवला.

या हल्ल्यात एका शेळीचा गोठ्यातच फडशा पाडण्यात आला. दुसऱ्या शेळीला घराशेजारील गिन्नी गवतात ओढून नेत ठार केले, तर एका बोकडाला ऊसाच्या शेतात फरफटत नेऊन फस्त केले. याशिवाय आणखी दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक शरद पांडव व वनसेवक बाळासाहेब डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान, जांबुत परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

Leave a Comment