संगमनेर(DSNews24) संगमनेर शहरातील केशवतीर्थ परिसरात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी पोलीस, नगरपालिका प्रशासन तसेच बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शोधमोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.
पारेगाव बुद्रुक येथील ऋषिकेश नवनाथ गडाख (वय २५) हा मित्रांसोबत केशवतीर्थ परिसरातील प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी नदीतील पाण्याचा वेग अचानक वाढल्याने तो प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, नगरपालिका प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता ऋषिकेशचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
दरम्यान, नीलम खताळ यांनी घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नदीतील वाढता पाण्याचा वेग आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शोधकार्य अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले. शोधमोहीमेत कोणतीही हलगर्जी होऊ नये तसेच प्रत्येक संभाव्य ठिकाणी कसून शोध सुरू ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी नीलम खताळ यांनी बेपत्ता ऋषिकेश गडाख यांच्या कुटुंबीयांची व नातेवाईकांची आस्थेने विचारपूस केली. या कठीण प्रसंगी धीर न सोडण्याचे आवाहन करत प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पोलीस, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकाच्या समन्वयातून शोधमोहीम सुरू असून, बेपत्ता तरुणाचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संगमनेर शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
