अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा दाबून सुमारे 20 सेकंद हवेत उचलल्याचा तसेच त्याच्या हाताचा चावा घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शाळेत वर्गातील काही विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू होते. त्याची माहिती संबंधित विद्यार्थ्याने वर्गशिक्षिका ज्योती यांना दिली. त्यानंतर शिक्षिकेने मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले.
तक्रारीनुसार, मुख्याध्यापकांनी भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळल्यानंतर, “भांडण कसे करतात ते मी दाखवतो,” असे म्हणत आठ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा पकडून त्याला वर उचलले आणि तोंडाने एक ते वीसपर्यंत आकडे मोजले. त्यानंतर विद्यार्थ्याला खाली सोडून त्याच्या हाताचा चावा घेतल्याचा आरोप आहे.
घरी गेल्यानंतर विद्यार्थ्याच्या हातावरील जखम आणि घडलेला प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या घटनेबाबत मुख्याध्यापकांशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी, “माझ्याकडून चुकीने ही घटना घडली. मी लेखी माफी पाठवतो. तुमचा पत्ता द्या,” असे सांगितल्याचा दावा पालकांनी केला आहे.
या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संबंधित मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे.
