राज्यासाठी पुढचे २४ तास देखील महत्वाचे असणार आहे. पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, धुळे जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राजवळ निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील २४ तासांमध्ये पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहील. मात्र उद्यानंतर पावसाचा जोर कमी होईल.
पुण्यातील घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे शहराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती पुणे वेधशाळेने जारी केली आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असला तरी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक धरणं भरली आहेत आणि ही बाब नक्कीच दिलासादायक आहे. पुढील २४ तासांसाठी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
