महाराष्ट्रात खळबळ! वन अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना अटक 

दीड लाख रुपये पगार असलेल्या विभागीय वन अधिकाऱ्याने (DOF) तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्विकारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपल्याच विभागात काम करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे लाचेची मागणी केली होती. मात्र हीच लाच घेणं विभागीय वन अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्याला रंगेहात अटक केली आहे. श्रीनिवास लखमवाड असं या विभागीय वनअधिकाऱ्याचं नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून २०२५-२६ या वर्षासाठी बीड जिल्ह्याला वृक्ष लागवडीसाठी एकूण ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. हा निधी वितरीत करण्यासाठी आणि आपल्याच विभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची (RFO) प्रलंबित वेतनवाढ देण्यासाठी लखमवाड यांनी १२ टक्के कमिशनची मागणी केली होती. ही रक्कम तब्बल ४५ लाख रुपये इतकी होत होती. विशेष म्हणजे, लखमवाड यांचा स्वतःचा दरमहा पगार सुमारे दीड लाख रुपये असं असताना त्याने केवळ एका फाईलवर सही करण्यासाठी आपल्या पगाराच्या ३० पट इतकी प्रचंड लाच मागितली होती.

धमकी आणि तक्रार

सुरुवातीला संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने लाच देण्यास नकार दिला होता. मात्र, लखमवाड यांनी सूडबुद्धीने त्यांची वेतनवाढ रोखली, निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील नर्सरीच्या कामाची चौकशी करण्याची धमकी दिली. अखेर वैतागून तक्रारदाराने निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या पथकाने बीडमधील भाड्याच्या घरात सापळा रचला. लखमवाड याने कमिशनचे पैसे देण्यासाठी तक्रारदाराला घरी बोलावले होते. पैसे स्वीकारताना ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने तोंडावरून हातरुमाल फिरवत घाम पुसण्याचा बहाणा केला. इशारा मिळताच बाहेर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने हा इशारा मिळताच घरात झाडप टाकली आणि लखमवाडला ४५ लाखांच्या रोख रकमेसह ताब्यात घेतले. एसीबीचे डीवायएसपी हनुमंत शिंदे आणि पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

२०१६ चा MPSC टॉपर कसा बनला लाचखोर?

लाचखोर श्रीनिवास लखमवाड हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावाचा रहिवासी आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये घेतल्यानंतर त्याने बी.टेक. केले होते. २०१६ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वनसेवा परीक्षेत तो अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून राज्यात प्रथम आला होता. राज्यात प्रथम आलेल्या आणि समाजात कष्ट आणि प्रामाणिकपणाचे धडे देणाऱ्या अधिकाऱ्यानेच एवढी मोठी लाच स्विकारल्याने प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment