मुंबई – अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या गच्छंतीनंतर रिकाम्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर वैशाली नागवडे यांची वर्णी लागली आहे.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अजित पवारांच्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्या म्हणून वैशाली नागवडे यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीत नवे वळण आले आहे.
अजित पवारांच्या विश्वासू अन् तळागाळातील नेतृत्व
मुळच्या दौंडच्या असलेल्या वैशाली नागवडे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. पुणे ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभारण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या याच संघटन कौशल्याची दखल घेत अजित पवारांनी यापूर्वी त्यांच्यावर ‘महानंदा दूध’च्या अध्यक्षपदाचीही महत्त्वाची धुरा सोपवली होती.
चाकणकरांशी वाद आणि पक्षातील स्थान
पक्षात रुपाली चाकणकर यांच्याविरोधात अनेकदा आक्रमक भूमिका घेतल्यामुळे वैशाली नागवडे या सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेत राहिल्या होत्या. आता थेट चाकणकर यांच्या जागीच नागवडे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे नेतृत्व अधिक आक्रमक आणि बळकट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
