ब्रेकिंग! साकूरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास

संगमनेर (DSNews24/किरण पुरी): तालुक्यातील साकूर येथील अमननगर परिसरात बुधवारी सकाळी धुमाकूळ घालून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. गुरुवारी पहाटे ही कारवाई यशस्वी झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमननगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. जाकीर अमीनभाई मोमीन यांच्या उसाच्या शेतात मादी बिबट्यासह वास्तव्य असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वनविभागाला दिली होती. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बुधवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास बिबट्या उसाच्या शेतातून बाहेर आला. त्याचवेळी चार ते पाच कुत्रे त्याच्या मागे लागल्याने काही काळ कुत्रे आणि बिबट्यामध्ये थरारक पाठलाग झाला. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे वैतागलेल्या बिबट्याने तेथून पळ काढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप जिरे, वनपरिमंडळ अधिकारी योगेश डोंगरे, वनरक्षक शंकर खेमनर तसेच वन कर्मचारी बाळासाहेब फटांगरे, सय्यद शेख, बाळू शेंगाळ, लहानू देवके आणि अशोक जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत उसाच्या शेतालगत दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. तसेच वनविभागाचे कर्मचारी रात्रंदिवस बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवून होते.

अखेर गुरुवारी पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत वनविभागाचे आभार मानले आहेत. मात्र, परिसरात आणखी बिबटे असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment