बारामती विमानतळावर जानेवारी महिन्यात विमान कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या घटनेत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर पुन्हा शिकाऊ विमानं कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. पण बारामती विमानतळावर शिकाऊ विमानांच्या अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये.
आज पुन्हा एकदा बारामती विमानतळ परिसरात प्रशिक्षण देणारे शिकाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही, तसेच पायलट सुरक्षित आहेत का? याबाबतची अधिकृत माहिती आणि तपशील मिळणं अद्याप बाकी आहे.
बारामतीत खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थांमार्फत नवख्या वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र, गेल्या काही काळात बारामती आणि आसपासच्या परिसरात शिकाऊ विमाने कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघातांमुळे बारामती विमानतळावरील हवाई सुरक्षा आणि विमानांच्या देखभालीबाबत मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
ही घटना घडताच विमानतळ प्रशासनासह स्थानिक पोलिसांनी आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला की हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे, याचा शोध घेतला जात आहे
