जुन्नर (DSNews24) : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्वीच्या सरळ मार्गानेच व्हावा, या मागणीसाठी क्रांतिदिनी पुणे-नाशिक महामार्गावर चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात चक्काजाम जनआंदोलन करण्यात आले. जवळपास चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष पुणे-नाशिक रेल्वेच्या प्रश्नाकडे वेधले गेले.
यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांनी प्रशासनाला जनभावनेचा आदर करण्याचे आवाहन केले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच झाला पाहिजे. नागरिकांच्या मागण्या रेल्वे मंत्रालयाने तातडीने मान्य कराव्यात; अन्यथा भविष्यात आंदोलनाच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.
‘महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवू नका’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही राहुल ढेंबरे पाटील यांनी टीका केली. “नरेंद्र मोदीसाहेब, आपण गुजरातचे भूमिपुत्र आहात म्हणून गुजरातला झुकते माप देताना महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचे काम करू नका. नवीन प्रकल्प गुजरातबरोबरच देशातील इतर राज्यांमध्येही आणावेत,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “दूरसंचारमंत्री असताना तत्परतेने काम करणारे अश्विनी वैष्णव साहेब, रेल्वेमंत्री झाल्यानंतर कुंभकर्णाच्या झोपेतून बाहेर या. पुणे-नाशिक रेल्वे सरळमार्गे द्या, अन्यथा खुर्ची खाली करा,” असा इशारा त्यांनी दिला.
पुणे-नाशिक रेल्वेच्या प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास सरकारला समजेल अशा स्वरूपाचे व्यापक जनआंदोलन पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून उभारण्यात येईल, असेही राहुल ढेंबरे पाटील यांनी स्पष्ट केले.
शेतकरी, विद्यार्थी, उद्योजकांमध्ये संताप
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाला परिसरातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रशासनाच्या भूमिकेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे यावेळी दिसून आले.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी अवघ्या दीड ते दोन तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. तसेच चाकण, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोले आणि संगमनेर या तालुक्यांतील ग्रामीण तसेच औद्योगिक पट्ट्याला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे मालवाहतूक अधिक सुलभ होऊन कृषी, व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला.
निवेदने, ई-मेलद्वारेही मागणी
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प सरळमार्गे व्हावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात निवेदने तसेच ई-मेलच्या माध्यमातून मागण्या पाठवल्या आहेत. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने क्रांतिदिनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक संघटना तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मोठे सहकार्य केले. पुणे-नाशिक रेल्वेच्या सरळ मार्गाच्या मागणीसाठी आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
