जुन्नरच्या महिलेचा मृतदेह श्रीगोंद्यात आढळला

शिरूर – शिरूरजवळ सतरा कमानीच्या पूलावरून घोडनदीच्या पात्रात उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह हिंगणी (ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर) जवळील सोनलकर वस्ती येथे नदीपात्रात आज आढळून आला. मृत महिलेजवळ असलेल्या पाकिटातील काही कागदपत्रे व फोटोवरून त्यांची ओळख पटली असून, कौटुंबिक कारणावरून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आशा दिलीप बोटकर (वय-४८, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव असून, शिरूर येथील शवागारात उत्तरीय तपासणीनंतर रात्री मृतदेह त्यांच्या कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मूळच्या मंगळूर पारगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील रहिवासी असलेल्या बोटकर या गेल्या काही वर्षांपासून पतीसमवेत कारेगाव येथे वास्तव्यास होत्या. त्यांचे पती रांजणगाव एमआयडीसीतील खासगी कंपनीत कामाला असून, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

गुरूवारी दुपारी त्या घरातून बाहेर पडल्या. मात्र, उशीर होऊनही त्या न परतल्याने आणि सर्वत्र शोधाशोध करूनही त्यांचा कुठलाही ठावठिकाणा न लागल्याने शुक्रवारी (ता. ७) दुपारी त्या बेपत्ता झाल्याची खबर दिलीप बोटकर यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन दिली होती.

Leave a Comment