अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
धीरज परदेशी असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणातील चार संशयितांना अटक केली आहे.
शुक्रवारी सायंकाळी मुकुंदनगर येथील दर्गा दायरा परिसरातील कबरस्तानात विद्युत पोलचे काम सुरू होते. यावेळी कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी हे काम करत असताना काही जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात धीरज गंभीर जखमी झाले.
जखमी धीरज यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आक्रोश केला.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद या चार जणांना अटक केली आहे. मात्र, धीरज परदेशी यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ल्यामागील कारणाचा पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, धीरज हे हिंदुत्ववादी विचारांचे असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. मात्र, या आरोपाची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे हल्ल्याचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचा इशारा देण्यात आल्याने पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
