महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलणार? थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून आमदाराची मागणी

महाराष्ट्रातील तीन असे जिल्ह्ये आहेत ज्यांची नावे बदलण्यात आली आहेत. यामध्ये औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्यात आले तर अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे करण्यात आले. त्यानंतर आता आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या महिला आमदाराने पत्र लिहिले आहे.भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान आणि असंख्य शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार श्वेता महाले यांनी लिहिलेल्या पत्रात, “उपरोक्त विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की, देशोदेशीच्या पर्यटकांना भुरळ घालणारे जगप्रसिद्ध लोणार सरोवर, विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे व संत श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शेगाव, मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य, सैलानी बाबा दर्गा अशा अनेक धार्मिक व पर्यटन स्थळांनी नटलेल्या बुलढाणा जिल्ह्यात जगभरातील पर्यटक पर्यटनासाठी येतात.

बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, ही बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. राजमाता जिजाऊसाहेब यांनी बाल शिवबांच्या मनात हिंदवी स्वराज्य संस्थापनेचे बीजरोपण केल्यामुळे ७०० वर्षाच्या जुलमी राजवटीतून महाराष्ट्र व देश मुक्त झाला. राजमाता जिजाऊसाहेब यांच्या या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून “राजमाता जिजाऊनगर” करण्यात यावे. जगभरातून येथे पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊसाहेब यांचे नाव जगभर पोहचेल. अहिल्यानगरच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यास देशभरातील समस्त शिवप्रेमींना आनंदच होईल. समस्त शिवप्रेर्मीच्या भावनांचा आदर करून बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून “राजमाता जिजाऊनगर” करण्यात यावे, ही नम्र विनंती” असे म्हटले आहे

Leave a Comment