संगमनेर – पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गावरून आता संघर्ष पेटला. पुणे-नाशिक रेल्वेमार्ग बदलण्याचा निर्णय झाल्यामुळं सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले.
रविवारी जुन्नर तालुक्यांसह संगमनेर आणि सिन्नर परिसरात नाशिक पुणे महामार्ग अडवल्यानं महामार्ग जवळपास दोन ते तीन तास ठप्प झाला होता. या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यासह 3500 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको केल्या प्रकरणी आंदोलनावर पोलिसांनी कारवाई केली. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर संगमनेर रेल्वे मागणी कृती समितीने रास्तारोको केला होता. आंदोलनामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास झाली होती विस्कळीत. पोलिसांनी 11 ज्ञात आंदोलकांसह तब्बल 3500 अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने आंदोलनाला पोलिसांनी नाकारली होती परवानगी. परवानगी नसतानाही मोठ्या संख्येने नागरिक जमले आणि रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखल्याचा पोलिसांचा आरोप आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या 11 ज्ञात जणांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात, शरद नाना थोरात, किशोर टोकसे, अमोल शेलकर, विजय रहाणे, नामदेव गुंजाळ, भाऊसाहेब रहाणे, सागर पावसे, डॉ. दानिश खान आणि नूरमोहंमद शेख यांचा समावेश आहे.
आंदोलनाचे नेतृत्व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असतानाही गुन्ह्यात त्यांचे नाव नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले. पुणे-नाशिक व्हाया संगमनेर रेल्वेचा प्रश्न आता विकासाबरोबरच राजकीय संघर्ष आणि कायदा-सुव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे.
