संगमनेर(DSNews24) तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माहूली परिसरात रानडुकराने शेतकऱ्यावर अचानक हल्ला केल्याची घटना सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या हल्ल्यात ५६ वर्षीय शेतकरी तुळशीदास रामभाऊ गाडेकर यांच्या चेहऱ्यावर व पाठीवर गंभीर दुखापत झाली. सुदैवाने या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले.
तुळशीदास गाडेकर हे माहूली परिसरात आपल्या कुटुंबासह राहत असून, सोमवारी सकाळी ते जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. शेताच्या बांधावर गवत कापत असताना अचानक शेजारील शेतातून रानडुक्कर आले आणि त्याने गाडेकर यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली.
गाडेकर यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी गाडेकर यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना संगमनेर येथे हलविण्यात आले. याबाबतची माहिती पांडुरंग गाडेकर यांनी दिली.
दरम्यान, माहूली परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रानडुकरांकडून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाच आता थेट शेतकऱ्यांवर हल्ले होऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रानडुकरांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी माहूली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
