साकूरच्या बिरोबारायांचा यात्रोत्सव १३ ऑगस्टपासून ; श्रावणभर भक्तिमय वातावरण

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) डफांचा आवाज आणि “बिरोबाच्या नावानं चांगभलं”चा जयघोष पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात घुमणार आहे. साकूर येथील आराध्य दैवत वीरभद्र (बिरोबा) महाराजांच्या यात्रोत्सवाला दि. १३ ऑगस्टपासून सुरुवात होत असून, संपूर्ण श्रावण महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबारायांच्या दर्शनासाठी यंदाही मोठ्या संख्येने भाविक साकूरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

साकूर येथील बिरोबा हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून, “साकूरचा बिरोबा” अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. श्रावण महिनाभर यात्रोत्सव सुरू असल्याने साकूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. गावोगावी डफांचा निनाद आणि “बिरोबाच्या नावानं चांगभलं”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.

यात्रोत्सवातील नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा हे दोन प्रमुख दिवस मानले जातात. या दिवशी लाखो भाविक बिरोबारायांच्या दर्शनासाठी साकूर येथे येतात. संगमनेर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, ठाणे यांसह राज्याच्या विविध भागांतून भाविक यात्रेत सहभागी होतात.

नारळी पौर्णिमेला विशेष धार्मिक परंपरा पार पडते. भाविक गंगेचे पाणी कावडीद्वारे पायी आणून बिरोबारायांना गंगास्नान घालतात. या दिवशी लाखो भाविक मनोभावे देवाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतात.

यात्राकाळात वाण, ओव्या यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटपही केले जाते. यासाठी अनेक स्वयंसेवक सेवा देत असतात. यात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी घारगाव पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

भाविकांना सुलभ आणि शिस्तबद्ध दर्शन घेता यावे यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने विशेष दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरापासून काही अंतरावर वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, यात्रेकरूंसाठी आवश्यक विविध सुविधाही करण्यात आल्या आहेत.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर आणि थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्या प्रयत्नातून मंदिर व परिसरात विविध विकासकामे करण्यात आली आहेत.

यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने साकूर येथे येऊन बिरोबारायांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर खिलारी यांनी केले आहे.

Leave a Comment