माशाचा काटा घशात अडकला? घाबरू नका, ‘हे’ करा उपाय 

माशाचा काटा घशात अडकला आहे असं जाणवत असेल, तर सर्वात आधी जेवण थांबवा. जोरात घसा खाकरत राहू नका आणि हात घालून काटा शोधण्याचाही प्रयत्न करू नका. दिसत नसलेली वस्तू बोटाने काढण्याचा प्रयत्न केल्यास ती आणखी आत जाऊ शकते.

खोकला येत असेल तर तो थांबवू नका

काटा घशाच्या वरच्या भागात अडकला असेल आणि तुम्हाला व्यवस्थित श्वास घेता येत असेल, तर नैसर्गिकरित्या येणारा खोकला काही वेळा मदत करू शकतो. खोकताना शरीर स्वतःच अडथळा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतं. मात्र खोकला येत नाही, बोलता येत नाही किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ही साधी काट्याची समस्या समजून दुर्लक्ष करू नका. श्वसनमार्ग बंद होण्याची शक्यता असू शकते आणि तातडीची मदत आवश्यक असते.

भाताचा मोठा घास घेणं खरंच योग्य आहे?

माशाचा काटा खाली ढकलण्यासाठी भाताचा मोठा गोळा, ब्रेडचा तुकडा किंवा केळं गिळण्याचा सल्ला अनेक घरांत दिला जातो. पण काटा टोकदार असल्यामुळे अशा पद्धतीने जबरदस्तीने पदार्थ गिळणे योग्यच असेल असं नाही. उलट अडकलेला काटा अधिक खोलवर जाऊ शकतो किंवा घशाला इजा होऊ शकते.

म्हणून ‘काहीतरी खाल्लं की काटा आपोआप खाली जाईल’ या घरगुतीसमजुतीवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. विशेषतः टोचण्याची वेदना कायम राहिली तर स्वतःहून प्रयोग करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं सुरक्षित आहे. टोकदार वस्तू अन्ननलिकेला इजा करू शकतात.

कोल्ड्रिंक किंवा व्हिनेगरचा प्रयोग?

काटा काढण्यासाठी सोडा, कोल्ड्रिंक, व्हिनेगर किंवा इतर पदार्थ घेण्याच्या अनेक टिप्स इंटरनेटवर आणि घरगुती चर्चांमध्ये ऐकायला मिळतात. काही वेळा गॅस असलेलं पेय अन्ननलिकेत अडकलेली वस्तू पुढे जाण्यास मदत करू शकतं, अशी वैद्यकीय माहिती उपलब्ध आहे. मात्र माशाचा काटा हा टोकदार असतो. त्यामुळे फक्त पेय पिऊन तो निघेलच, असं मानणं योग्य नाही.

नेमकं कधी डॉक्टरांकडे जावं?

काटा अडकला असल्याची भावना सतत राहात असेल, गिळताना त्रास होत असेल, छातीत किंवा घशात वेदना जाणवत असतील किंवा पाणीही नीट गिळता येत नसेल, तर वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे. काही वेळा काटा निघून गेल्यानंतरही घशावर झालेल्या ओरखड्यामुळे काही काळ टोचल्यासारखं वाटू शकतं. मात्र त्रास वाढत असेल तर तपासणी करून घेणं चांगलं.

श्वास घेण्यास अडचण, सतत गुदमरल्यासारखं होणं किंवा थुंकीसुद्धा गिळता न येणं ही धोक्याची चिन्हं आहेत. अशा वेळी घरगुती उपाय करत बसू नका. तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

माशाचा काटा अडकणं ही छोटी गोष्ट वाटली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. पुढच्या वेळी अशी वेळ आली, तर घाबरून मोठमोठे घास गिळण्यापेक्षा आधी शांत राहा, श्वास व्यवस्थित आहे का ते पाहा आणि त्रास कायम असल्यास डॉक्टरांकडे जा. काही मिनिटांची काळजी पुढचा मोठा त्रास टाळू शकते.

Leave a Comment