नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (SAD) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी महाराष्ट्रातील नांदेड येथील श्री हजूर साहिब अंतर्गत असलेल्या माता साहेब गुरुद्वाराजवळ जीवघेणा हल्ला झाला. एका हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, ज्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ‘यशोसाई रुग्णालयात’ दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना कशी घडली?
ही घटना दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडली. सुखबीर सिंग बादल गुरुद्वाराकडे जात असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांच्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत हल्लेखोराला रोखले; मात्र या झटापटीत बादल जखमी झाले.
पोलीस निरीक्षकही जखमी; हल्लेखोर ताब्यात .
विशेष सुरक्षेत तैनात असलेले पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच्यावरही माता साहेब गुरुद्वाराजवळ हल्ला झाला ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.
