संगमनेर : श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, संगमनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने युवान महिमेंतर्गत रक्षाबंधनानिमित्त आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी संगमनेर एस.टी. आगारातील चालक, वाहक, कर्मचारी तसेच विक्रेत्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
या उपक्रमात महाविद्यालयातील २० विद्यार्थिनींनी सुमारे १०० एस.टी. चालक, वाहक, कर्मचारी व विक्रेत्यांना राखी बांधली. प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नागराज खराडे यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपप्राचार्य डॉ. राहुल देशमुख, प्रा. रामदास सोन्नर आणि डॉ. प्रतिक शिंदे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संजय मणिआर आणि कार्यालयीन अधीक्षक सचिन वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमातून ‘सेवेचा सन्मान आणि नात्यांचा अभिमान’ हा संदेश देत विद्यार्थिनींमध्ये सामाजिक संवेदनशीलता, कृतज्ञता आणि सेवाभावाची भावना वृद्धिंगत करण्यात आली.
दीपिका सावंत, आदिती भालेराव, श्रावणी गायकवाड, हिना शेख, स्वप्नाली काळे, स्वालेहा शेख, श्रावणी रहाणे, संस्कृती कोल्हे, वैष्णवी पावबाके, इकरा बेपारी, पूजा यादव, मृणाल त्रिभुवन, अबोली गुरुड, खुशी गोंडखे, अर्शिया इनामदार, नम्रता रनाते आदी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
