मृत युवकाच्या खिशात आढळली चिठ्ठी ; एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती
संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भागूबाई खेमनर यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या एका ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे संपूर्ण पठारभागात खळबळ उडाली आहे.
विश्वास भाऊसाहेब लोहटे (वय ३२, रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे मृत युवकाचे नाव आहे.
मांडवे बुद्रुक येथील शिव मंदिराच्या पाठीमागील बाजूस वनविभागाच्या हद्दीत असलेल्या लिंबाच्या झाडाला विश्वास लोहटे यांनी गळफास घेतल्याचे रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले, आदिनाथ गांधले, प्रमोद गाडेकर व सुभाष बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह खाली उतरविला. त्यानंतर कायदेशीर पंचनामा करण्यात आला. मृतदेह मातोश्री हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील घुलेवाडी येथे पाठविण्यात आला.
दरम्यान, मृत विश्वास लोहटे यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यामध्ये एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीतील मजकूर आणि त्यामागील नेमका संदर्भ काय आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच भागूबाई खेमनर यांचा मृत्यू
या घटनेला आणखी एक गंभीर पार्श्वभूमी आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी हिरेवाडी येथील भागूबाई काशिनाथ खेमनर यांचा मृतदेह साकूर शिवारात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांच्या आधारे घारगाव पोलीस ठाण्यात भागूबाई खेमनर यांच्या आत्महत्येप्रकरणी विश्वास लोहटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असतानाच संबंधित गुन्ह्यात नाव असलेल्या विश्वास लोहटे यांनीही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांमधील परस्परसंबंध, चिठ्ठीतील मजकूर तसेच आत्महत्येमागील नेमके कारण याबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.
