संगमनेर (DSNews24/किरण पुरी) “बिरोबाराया हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असून, या जागृत देवस्थानची सेवा करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी श्रद्धेची बाब आहे. जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा साकूर जिल्हा परिषद गटासाठी पहिल्या प्राधान्याने काम करायचे, हा माझा कायम हेतू राहिला आहे,” असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त आ. सत्यजित तांबे यांनी संगमनेर तालुक्यातील साकूर येथील श्री विरभद्र बिरोबा देवस्थानला भेट देत बिरोबारायांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून देवस्थानच्या विकासकामांसाठी मंजूर झालेल्या ५० लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली.
यावेळी बोलताना आ. तांबे म्हणाले, “श्री क्षेत्र बिरोबा यात्रोत्सवानिमित्त बिरोबारायांच्या दर्शनासाठी आलो आहे. बिरोबाराया हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. माझा आणि बिरोबारायांचा संबंध २०१२ साली जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी उभा होतो, तेव्हापासूनचा आहे. हे अतिशय जागृत देवस्थान असून, या ठिकाणी आल्यानंतर बिरोबारायांची सेवा करावीच लागते. आपण जी सेवा करतो, त्याची पोचपावती बिरोबाराया देतात, हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे.”
बिरोबा देवस्थानच्या विकासाबाबत बोलताना तांबे म्हणाले की, बिरोबारायांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थानचा विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून २० लाख रुपये खर्च करून भक्तनिवास उभारण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेकडून १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
“२०२३ मध्ये आमदार झाल्यानंतर बिरोबा देवस्थानसाठी ५० लाख रुपयांचा पहिला निधी मंजूर केला. या निधीतून मंदिर परिसरात दर्शन रांगा तसेच इतर विकासकामे सुरू झाली. मात्र, ठेकेदारांचे पैसे थकल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असून, कामे अर्धवट राहिली आहेत. निधी उपलब्ध होत जाईल, तसे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील,” असे तांबे यांनी सांगितले.
देवस्थानच्या भविष्यातील विकासासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून देवस्थान परिसरातील उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
तालुक्यातील विविध मंदिरांच्या विकासासाठी यापूर्वी भरीव निधी आणला असल्याचे सांगत आ. तांबे म्हणाले, “सध्या सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता निधीची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने नवीन कामे मंजूर करण्यापूर्वी अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे.”
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, युवा नेते बाळासाहेब सागर, सरपंच सचिन सोनवणे, विठुराज मैड, आदिकराव खेमनर, लक्ष्मण कुदनर, सुभाष शेंडगे, कैलास गाडेकर, किशोर खिलारी, मल्हारी सोन्नर, चांगदेव खेमनर, रूपेश धुळगंड, सोपान खेमनर, रमेश पेंडभाजे, बाबाजी सागर, प्रशांत शेलार, अली पठाण, सचिन केदारी, मन्सूर पटेल, किशोर कोळपकर, कैलास पेंडभाजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
