अहिल्यानगर : यंदा राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने पेरण्यांनाही विलंब झाला. ऑगस्ट महिन्यात अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतर पिके उपटून टाकल्याचे चित्र आहे.
पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान होत असलेल्या भागातील शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी होत असतानाच हवामान व पावसाच्या अंदाजासाठी ओळखले जाणारे पंजाबराव डख यांनी आगामी काळातील पावसाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून, १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.
१७ व १८ सप्टेंबरला विखुरलेल्या पावसाची शक्यता
डख यांच्या अंदाजानुसार, १७ आणि १८ सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत जोरदार, मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर होणार नसून काही भागांपुरता मर्यादित राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या कालावधीत पुणे, मुंबई तसेच कोकण पट्ट्यातही पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
१९ ते २४ सप्टेंबरदरम्यान दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस?
१९ ते २४ सप्टेंबरदरम्यान दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे तसेच बारामती, दौंड, माण-खटाव, इंदापूर या भागांसह बीड, आष्टी, जामखेड, कर्जत, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि जालना परिसरात पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दक्षिण महाराष्ट्रातून पावसाला सुरुवात होऊन पुढे लातूरसह मराठवाड्यातील भागात पाऊस पोहोचू शकतो, तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना कामे उरकण्याचे आवाहन
१८ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी खुरपणी, फवारणीसह आवश्यक शेतीची कामे उरकून घ्यावीत, असे आवाहन डख यांनी केले आहे.
दरम्यान, हा अंदाज प्रत्यक्षात कितपत साकारतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाडा, विदर्भासह राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी पाऊस झाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो.
