संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर-संगमनेर रस्त्यावर चिंचेवाडी जवळ बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास भरधाव आयशर टेम्पोने ओव्हरटेक करताना रुग्णवाहिकेला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात रुग्णवाहिकेच्या समोरील बाजूची काच फुटली. सुदैवाने रुग्णवाहिकेतील पाच ते सहा जणांना कोणतीही दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथून एसएमबीटी डेंटल कॉलेजची रुग्णवाहिका साकूर येथे आयोजित करण्यात आलेल्या चेकअप कॅम्पसाठी जात होती. रुग्णवाहिका चिंचेवाडी परिसरात आली असता, मागून आलेल्या एका भरधाव आयशर टेम्पोने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी टेम्पोने रुग्णवाहिकेला एका बाजूने धडक दिली.
धडकेमुळे रुग्णवाहिकेच्या समोरील काचेचे नुकसान झाले. मात्र, वाहनातील पाच ते सहा जण सुदैवाने बचावले. दरम्यान, अपघातानंतर आयशर टेम्पो चालकाने वाहन न थांबवता साकूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेल्याचे सांगण्यात आले.
या घटनेमुळे काही काळ परिसरात चर्चा निर्माण झाली असून, पसार झालेल्या आयशर टेम्पोचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.
