मुळा नदीवरील बंधाऱ्यांना तातडीने ढापे टाका ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) साकूर पठार भागात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पठार भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मुळा नदीच्या पात्रातील पाणीसाठाही सध्या अत्यल्प असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता परतीच्या पावसाकडे लागले आहे.

या पार्श्वभूमीवर मुळा नदीवरील जांबूत, साकूर आणि मांडवे येथील को.प. बंधाऱ्यांना तातडीने ढापे टाकून पाणी अडविण्याचे आदेश संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष रऊफ शेख आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर यांनी जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून, पावसाअभावी पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे. साकूर पठार भागातील परिस्थितीही चिंताजनक बनली असून, परिसरातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

मुळा नदीवरून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाइपलाइन केल्या आहेत. तसेच विविध ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनाही मुळा नदीवर अवलंबून आहेत. मात्र सध्या नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसाने हजेरी लावल्यास उपलब्ध होणारा प्रत्येक थेंब अडविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र त्यासाठी बंधाऱ्यांना वेळेत ढापे टाकणे आवश्यक आहे. ढापे न टाकल्यास परतीच्या पावसातून उपलब्ध होणारे पाणी वाहून जाण्याची शक्यता असून, त्याचा फटका आगामी रब्बी हंगामातील शेतीला बसू शकतो. तसेच परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे जांबूत, साकूर आणि मांडवे येथील को.प. बंधाऱ्यांना तातडीने ढापे बसवून पाणीसाठा निर्माण करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

वेळेत ढापे टाकल्यास पाण्याचा मोठा फायदा

“मुळा नदीवरील बंधाऱ्यांना वेळेत ढापे टाकल्यास परतीच्या पावसातून उपलब्ध होणारा पाणीसाठा अडविता येईल. या साठ्याचा साकूर पठार भागातील शेतकऱ्यांना आगामी रब्बी हंगामात मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांची भेट घेऊन त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले. पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला सुचना केली आहे.”

– रऊफ शेख, जिल्हाध्यक्ष, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, अहिल्यानगर उत्तर

Leave a Comment