अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय समीकरणांना वेग ; विखे-थोरात एकत्र येणार?

अहिल्यानगर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, लवकरच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. बँकेच्या २१ संचालक जागांपैकी सेवा सोसायटी मतदारसंघातील बहुतांश जागांवर उमेदवार निश्चित होण्याच्या मार्गावर आहेत. संबंधित तालुक्यांतील सेवा सोसायट्यांच्या मतदारांचे ठराव स्थानिक नेत्यांकडे असल्याने अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे जुळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बहुतांश मतदारसंघांत स्थानिक पातळीवर सहमतीचे प्रयत्न सुरू असले, तरी उर्वरित मतदारसंघांमध्ये निवडणुकीची शक्यता कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संभाव्य राजकीय समीकरणांकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मागील निवडणुकीत चार जागांवरच मतदान

जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी मागील पंचवार्षिक निवडणुकीत केवळ चार जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले होते. उर्वरित जागा सर्वपक्षीय नेत्यांच्या चर्चेतून बिनविरोध करण्यात आल्या होत्या. त्यावेळी विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मैदानात होते. या पॅनलमध्ये भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, विवेक कोल्हे आणि जामखेडचे अमोल राळेभात यांचा समावेश होता.

यानंतरच्या काळात जिल्हा बँकेतील राजकीय परिस्थितीत बदल झाले. बँकेवर विखे पाटील आणि भाजपच्या माध्यमातून कर्डिले यांचा प्रभाव राहिला. कर्डिले यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. मात्र, बँकेतील राजकीय प्रभावाबाबत भाजप आणि विखे गटाचे वर्चस्व असल्याची चर्चा कायम राहिली.

विखे-थोरात एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण

यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विखे विरुद्ध थोरात असा सामना होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच, सहकार क्षेत्रातील राजकारणात दोन्ही नेते एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल उभे राहण्याची शक्यताही चर्चेत आहे. या संभाव्य राजकीय समीकरणांमुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

११ जागांवर अद्याप पेच

सेवा संस्थांच्या १४ जागांपैकी १० जागांवर नेत्यांमध्ये सहमती झाल्याचे समजते. मात्र, उर्वरित चार सेवा संस्था मतदारसंघांसह इतर सात अशा एकूण ११ जागांवर अद्याप एकमत झालेले नाही.

यामध्ये महिलांसाठीच्या दोन जागा, बिगरशेती मतदारसंघातील एक जागा, शेतीपूरक मतदारसंघातील एक जागा तसेच अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील प्रत्येकी एक अशा तीन राखीव जागांचा समावेश आहे.

या जागांवर विविध गटांकडून दावे-प्रतिदावे सुरू असल्याने येथे प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारी आणि पॅनलची रचना स्पष्ट झाल्यानंतरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.

Leave a Comment