मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. सरकारला तीन महिन्यांचा अल्टिमेटम देत आज उपोषण सोडल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसंच, हे आंदोलन मी थांबवणार नाही. शेवटचा निर्णय करेन आणि तेव्हाच थांबेन हा तुम्हाला शब्द देतो, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आज पहाटेच भाजप नेते प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे नेते दादासाहेब भूसे यांनी मनोज जरांगे यांची पाटोदा येथे भेट घेतली होती. आजच्या बैठीत जरांगेंच्या उपोषणावर महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय. त्यानंतर सकाळीच जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं असून सरकारच्या शिष्टाईला यश आलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना म्हटलं की, ‘माझा जीव मी तुमच्या चरणांवर अर्पण केला आहे. सातारा संस्थानसाठी आपल्याला तीन महिने वेळ हा द्यावाच लागतो. तेवढा वेळ द्या. ही सगळी कामं सरकार करुन देतील. जर नाही करुन दिली तर हे आंदोलन थांबलेले नाही. हे असंच सुरू आहे.’
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळं पिंजून काढलं आहे. नंतरही पिंजून काढेन. जर तीन महिन्यात आपल्याला धोका झालाच तर उपोषण वगैरे नाही. सगळ्या मायमाऊलींना मुंबईत यायचा आहे. सगळ्या महिला-पोरं बांधवांना घेऊन मुंबई गाठू. पुन्हा माघारी यायचं नाही. तुमच्या विचारांती एवढा वेळ दिलाय. पुन्हा पुन्हा तुम्ही त्रास करुन घेऊ नका. मी आयुष्यभर तुमच्या लेकराबाळांसाठी लढणरा आहे. वेळ दिला म्हणून काही झालं नाही. 90 दिवस बोलता बोलता निघून जातील, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
