श्रीरामपूर : तालुक्यातील उक्कलगाव येथे २७ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आशिष उर्फ लाल्या विजय पारखे (वय २७, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष पारखे हे माजी ग्रामपंचायत सदस्य विजय रत्नाकर पारखे यांचे धाकटे चिरंजीव होते. आशिष यांची सासुरवाडी कोपरगाव येथे असून, ते गेल्या दोन महिन्यांपासून सासुरवाडी येथे राहत होते.
दरम्यान, काल रात्रीच्या सुमारास आशिष यांचा मृतदेह घराच्या पडवीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
मृत आशिष यांच्या वडिलांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे. आशिष यांना जबर मारहाण करून त्यांचा मृतदेह रात्रीच्या वेळी पडवीत आणून टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेले शस्त्र पोलिसांच्या हाती लागले आहे का, याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी भेट देऊन पाहणी केली.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांच्या तपासानंतरच आशिष पारखे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेचे सत्य स्पष्ट होणार आहे.
