पावसाचा कहर! वीज पडून पती पत्नीसह ५ जणांचा मृत्यू, ऐन गणेशोत्सवात शोककळा 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके वाळून गेली असून शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे आता शासनाच्या मदतीकडे आणि निधीच्या घोषणेकडे लक्ष लागले आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसादरम्यान वीज पडून घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे मूगाच्या शेंगा तोडण्यासाठी शेतात गेलेले मनोहर भिवसन दुधे आणि पर्वताबाई मनोहर दुधे हे पती-पत्नी पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातील झोपडीत थांबले होते. त्याचवेळी झोपडीवर वीज कोसळल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

दुसरी घटना कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातील वाघुळखेडा येथे घडली. शेतात अद्रक पिकाची खुरपणी सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी काही जणांनी कवठाच्या झाडाचा आसरा घेतला. याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने फर्जाना हामीद सय्यद, आल्मीरा हामीद सय्यद आणि तस्लीम मुक्तार सय्यद यांचा मृत्यू झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन्ही घटनांनंतर स्थानिकांनी प्रशासनाशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती दिली.

दरम्यान, जालन्यासह मराठवाड्यातील काही भागात अनेक दिवसांच्या खंडानंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जालना शहर आणि परिसरातही सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून, पावसाच्या आगमनाने काहीसा दिलासा मिळाला असला तरी वीज कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दुर्दैवी घटनांमुळे दोन्ही परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment