संगमनेर(DSNews24) संगमनेर शहरालगत असलेल्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. मात्र, उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम संबंधित ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे आणि अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. या कामाला गती देऊन मार्च महिन्यापर्यंत बांधकाम पूर्ण झाले पाहिजे. अन्यथा संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेऊन नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या सनियंत्रण व सल्लागार समितीची बैठक आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवशंकर वलांडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा समितीचे सचिव डॉ. राजकुमार जऱ्हाड, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, विनायक वाडेकर, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, युवा सेना शहरप्रमुख सौरभ देशमुख आदी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे दर्जेदार व वेळेत बांधकाम पूर्ण करून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून तुमची आहे. बांधकामाची गुणवत्ता आणि वेग याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मार्चपर्यंत काम पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करावे. जोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सुरू राहील. ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर प्रस्तावित स्त्री रुग्णालय उभारता येईल का, याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
साकूर, चंदनापुरी आणि तळेगाव परिसरातील नागरिकांना शवविच्छेदनासाठी संगमनेर शहरात दूरवर यावे लागू नये, यासाठी या तीन ठिकाणी लवकरात लवकर शवविच्छेदनगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जागेचा प्रश्न असल्यास तो माझ्या निदर्शनास आणून द्यावा. तो प्रश्न मार्गी लावला जाईल. ग्रामीण रुग्णालयात स्वच्छ पाणीपुरवठा, पाण्याची टाकी, स्वच्छतागृह तसेच परिसरातील रस्त्यांवरील छोटे-मोठे खड्डे या समस्या तातडीने दूर कराव्यात. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही योग्य सेवा व सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करण्याची गरज आहे, असेही आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट सांगितले.
संगमनेर शहरातील धर्मादाय विभागाच्या यादीत असलेल्या आणि धर्मादाय रुग्णालय म्हणून सेवा देणाऱ्या रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयाबाहेर ‘धर्मादाय रुग्णालय’ असा स्पष्ट फलक लावावा. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयांना तातडीने सूचना द्याव्यात. पंधरा दिवसांच्या आत फलक लावण्यात आला आहे की नाही, याची पाहणी करून अहवाल सादर करावा. तसेच ग्रामीण भागात वैद्यकीय शिबिरे आयोजित करावीत. ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी वैद्यकीय यंत्रणेने घ्यावी.”
— अमोल खताळ, आमदार
