संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागात पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा थेट फटका खरीप पिकांना बसला आहे. पावसाअभावी साकूर मंडळातील तब्बल ५३.४० टक्के खरीप क्षेत्र बाधित झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
साकूर मंडळात यंदाच्या खरीप हंगामात एकूण २२ हजार १४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ११ हजार ७५६.५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत बाधित क्षेत्राचे प्रमाण निम्म्याहून अधिक असल्याने साकूर मंडळातील पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची तीव्रता स्पष्ट होत आहे.
पठार भागात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याबरोबरच उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
साकूरसह पठार भागातील अनेक गावांमध्ये खरीप हंगामातील पिके पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे पावसाचा खंड आणखी वाढल्यास बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने बाधित क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
