तहानलेल्या संगमनेरला महायुती सरकारने पाणी दिले – राधाकृष्ण विखे पाटील

चिंचोली गुरवसह पंचक्रोशीसाठी ५ कोटींच्या उपसा सिंचन पाइपलाइन कामाचा शुभारंभ

संगमनेर, दि. २३ (प्रतिनिधी) : तहानलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांना महायुती सरकारच्या माध्यमातून पाणी मिळाले. उन्हाळ्यातही तालुक्यातील २४७ तळी भरून देण्यात आली. पाणी देण्याचा पायगुणही चांगला लागतो. तालुक्यातील तळ्यांमध्ये पाणी जात असताना काही जण नेमक्या कोणत्या पाण्यासाठी लढा देत आहेत, असा थेट सवाल करत दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महायुती सरकार कणखर आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

चिंचोली गुरव आणि पंचक्रोशीतील गावांसाठी सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीतून उपसा सिंचन पाइपलाइन कामाचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार अमोल खताळ, भाजपचे ज्येष्ठ नेते सुदामराव सानप, कपिल पवार, विठ्ठलराव घोरपडे, राजेंद्र सोनवणे, भीमराज चतर, आबासाहेब थोरात, श्रीकांत गोमासे, जनार्दन आहेर, शरद गोर्डे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण झाला आहे. निळवंडे धरण पूर्ण होऊनही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा अपेक्षित लाभ मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने उपसा पद्धतीने नलिका वितरण प्रणालीच्या कामाला मान्यता दिली असून, त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘निळवंडेच्या विषयावरून विखे परिवाराला बदनाम केले’

निळवंडेच्या विषयावरून यापूर्वी केवळ विखे परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करत मंत्री विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीका केली. निळवंडे धरणाच्या कामासाठी अनेक वर्षे लागली. महायुती सरकारच्या काळात तीन वर्षांत पाणी देण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

मागील उन्हाळ्यात २२७ तळी भरून देण्यात आली, तर भविष्यात २३९ तळी भरून देण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. तालुक्यातील तळ्यांमध्ये पाणी जात असताना काहीजण केवळ पाणी खाली चालल्याची चर्चा करतात. ‘तुमचा लढा नेमक्या कोणत्या पाण्यासाठी?’ असा सवाल त्यांनी केला.

दुष्काळाच्या संकटावर सरकार सज्ज – विखे

यंदा दुष्काळाचे सावट मोठे असून विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत मंत्री विखे पाटील म्हणाले की, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने या संकटावर मात करण्यासाठी सरकार सज्ज आहे.

विरोधक दुष्काळाचे राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली. प्रत्येक प्रश्नाचे राजकारण करण्याची सवय लागली आहे. आपण काही करू शकलो नाही, म्हणून जनतेने तुम्हाला घरी बसवले, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. ‘महायुती सरकारला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकार कणखर आहे,’ असे विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

पाण्यासाठी लढा दिल्यानेच १३ किलोमीटर बंदिस्त योजनेला गती – आमदार अमोल खताळ

आमदार अमोल खताळ म्हणाले की, पाण्यासाठी लढा दिल्यामुळेच १३ किलोमीटर बंदिस्त योजनेच्या कामाला गती मिळाली आहे. लोकांविषयी आस्था आणि प्रेम असल्यामुळे अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होत आहे. या योजनेसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भोजापूर चारीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे ७२ दिवस पाणी मिळू शकले. नदीजोड प्रकल्पातही या भागाचा समावेश झाला आहे. आता देवनदीच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे खताळ यांनी सांगितले.

वीज टंचाईवर मात करण्यासाठी मागणीनुसार डीपी उपलब्ध करून देण्यात आले. यापूर्वी डीपीसाठी पैसे घेतले जात होते, असा आरोप त्यांनी केला. महायुती सरकारच्या काळात सौरऊर्जेवर भर देण्यात येत असून, विकासकामांमध्ये कोणीही अडथळे आणू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या देवदर्शनावरही काही जण टीका करतात. मात्र देव, देश आणि धर्मासाठी आपले काम सुरू असून, कितीही टीका झाली तरी सामान्य माणसांसाठी काम करत राहणार, असे आमदार खताळ यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी विठ्ठलराव घोरपडे आणि अभियंता प्रदीप हापसे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment