सिन्नर(DSNews24 ) देवस्थान इनाम जमीनधारक, पुजारी, अर्चक, सेवाधारी तसेच भोगवटादार वर्ग-३च्या हक्कांच्या प्रश्नासाठी केडगाव चौफुला (ता. दौंड) येथील श्री बोरमालनाथ देवस्थान परिसरात देवस्थान इनाम कृती समितीच्या वतीने राज्यस्तरीय विराट महाअधिवेशन आयोजित करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या देवस्थान इनामधारकांचा या अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातील देवस्थान इनामधारक, समाजबांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत हक्कांच्या लढ्याला पाठिंबा दिला.
महाअधिवेशनाचा प्रारंभ स्वागतगीत, दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाला. अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके, ओमप्रकाश गिरी, ॲड. राजेंद्र बन, दत्तात्रय गिरी महाराज, ॲड. विश्वजीत देशपांडे, अनुप गोसावी (नाशिक), सिन्नर तालुका सरचिटणीस वसंत गोसावी, सूर्यभान गोसावी, सूर्यकांत गिरी, प्रकाश गोसावी, पंडित गोसावी (पुणे), मुन्नागिरी गोसावी (पंढरपूर), धन्यकुमार पुरी पाटील (धाराशिव) आदी उपस्थित होते.
यावेळी वसंत गोसावी यांनी देवस्थान इनामधारकांनी संघटित होऊन कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले. देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून अनेक पिढ्यांच्या उपजीविकेशी, धार्मिक परंपरांशी आणि हक्कांशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व धर्मीय पुजारी आणि इनामधारकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी पुढाकार घेतलेल्या आयोजकांचे त्यांनी आभार मानले.
आमदार रत्नाकरकाका गुंदे यांनी दूरध्वनीद्वारे महाअधिवेशनाशी संपर्क साधत देवस्थान इनामधारकांचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असल्याचे सांगितले. देवस्थान इनाम जमीन भोगवटादार वर्ग-३चे हक्क पूर्ववत मिळवून देण्यासाठी संघटित आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
दशनाम गोसावी समाज परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश गिरी यांनी इनामधारकांच्या प्रश्नावर भूमिका मांडत समाजबांधवांनी संघटित होण्याचे आवाहन केले. तर आंदोलनाचे कायदेशीर अभ्यासक ॲड. राजेंद्र बन यांनी प्रश्नाची कायदेशीर बाजू, न्यायालयीन व प्रशासकीय लढ्याचे महत्त्व तसेच संघटनेची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
परशुराम सेवा संघाचे नेते ॲड. विश्वजीत देशपांडे यांनी इनाम जमिनीचा इतिहास आणि त्यासंदर्भातील विविध कायदेशीर बाबींवर अभ्यासपूर्ण विवेचन केले.
मुंबईत ५० जणांचे आमरण उपोषण करण्याची घोषणा
महाअधिवेशनाचे अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांनी देवस्थान इनामधारकांच्या प्रश्नावर शासनाने गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगत मुंबईत ५० जणांचे तीव्र आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही देवस्थान इनामधारकांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. रास्त मागण्यांसाठी सर्वांनी सामूहिकरीत्या संघटित होऊन मुंबईत जाण्याची गरज व्यक्त करत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न करण्याची आणि या लढ्यात सोबत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या महाअधिवेशनाला संदीप गोसावी, पंकज गोसावी (पुणे), सिन्नर तालुका माजी अध्यक्ष रतनपुरी गोसावी, उत्तम गोसावी, दिलीप गोसावी, सोमनाथ गोसावी, बाळपुरी गोसावी, कैलास गोसावी, संगमनेर तालुका अध्यक्ष माधव विठ्ठलपुरी गोसावी, दिनेश गोसावी, चंद्रकांत रामगिरी गोसावी, शंकर रामगिरी गोसावी, माधव रामगिरी गोसावी, भगवान देवगिरी गोसावी, हरिश्चंद्र दगडू गिरी, सुनील सुधाकर गिरी, बाळासाहेब गोविंद गिरी, बाळासाहेब रामगिरी गोसावी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून देवस्थान इनामधारक, गुरव-पुजारी, ब्राह्मण, गिरी, गोसावी, बैरागी, मुस्लिम काझी यांसह विविध समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे केडगाव चौफुला येथील या महाअधिवेशनातून देवस्थान इनामधारकांच्या हक्कांच्या प्रश्नावर विविध समाजांची एकजूट आणि संघटित लढ्याचा निर्धार अधोरेखित झाला.
